MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! आयोगाचा मोठा निर्णय; आता पोलिस करणार चौकशी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या कथित पेपरफुटीच्या आरोपांनंतर आयोगाने अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी प्रश्नपत्रिका फुटल्याचा आणि ती 12 लाख रुपयांत विकली गेल्याचा दावा केल्यानंतर MPSC ने आरोपांची सखोल चौकशी करून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेपरफुटीच्या आरोपांनंतर MPSC चे आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेऊन आयोगाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षकाच्या 154 पदांसाठी 22 मार्च 2026 रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन परीक्षा घेण्यात आली होती.

या परीक्षेचा निकाल 12 जून 2026 रोजी जाहीर झाला. त्यानंतर 1 जुलै ते 22 जुलै या कालावधीत पात्र ठरलेल्या 488 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीच्या अंतिम दिवशी म्हणजे 22 जुलै रोजी पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादीही प्रसिद्ध करण्यात आली.


आयुक्तांच्या माहितीनुसार, 21 जुलै रोजी ‘गौरव पाटील’ या ई-मेल आयडीवरून आयोगाकडे तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीत 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आणि त्याचा फायदा एका उमेदवाराला झाल्याचा दावा करण्यात आला होता. सुरुवातीला तक्रारीसोबत ठोस पुरावे नसल्याने तक्रारदाराला अतिरिक्त पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर ई-मेलद्वारे काही कागदपत्रे आणि पुरावे आयोगाकडे पाठविण्यात आले.
या पुराव्यांच्या आधारे आयोगाने प्राथमिक पडताळणी सुरू केली असून, 27 जुलै रोजी तक्रारदार आणि ज्याला लाभ झाल्याचा आरोप करण्यात आला त्या उमेदवाराला चौकशीसाठी आयोगाच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. मात्र, दोघेही चौकशीसाठी हजर राहिले नाहीत, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची सखोल तपासणी केली जाईल. तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रकरणात पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार आहे, असे MPSC कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या कथित पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांमध्ये चिंता निर्माण झाली असून, चौकशीत नेमके काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.