पुणे जिल्हा परिषद सभेत मोठा गोंधळ! राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी (दि. 27 जुलै) मोठा गोंधळ उडाला. बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला पदाधिकाऱ्याने सभागृहात अचानक प्रवेश करून व्यासपीठासमोरच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
या प्रकारामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. मात्र, सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने तिच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

पुणे जिल्हा परिषदेच्या चालू आर्थिक वर्षाच्या (2026-27) पुरवणी अंदाजपत्रकासाठी सर्वसाधारण सभा सुरू होती. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे होते. सभेच्या सुरुवातीला दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पुरवणी अंदाजपत्रकावर चर्चा सुरू असतानाच संबंधित महिला पदाधिकारी अचानक सभागृहात दाखल झाली.


सभागृहात प्रवेश करताच तिने आरडाओरडा सुरू केला आणि व्यासपीठासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सभागृहातील सदस्य आणि अधिकारी काही काळ स्तब्ध झाले. मात्र, बाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत तिच्या हातातील पेट्रोलची बाटली ताब्यात घेतली. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.
घटनेनंतर संबंधित महिलेला तातडीने ताब्यात घेऊन हिरकणी कक्षात नेण्यात आले. या घटनेमुळे काही काळ सभेचे कामकाज विस्कळीत झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा सभा सुरू करण्यात आली.
या घटनेची जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाची कानउघाडणी करत सभागृहातील सुरक्षा व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच सदस्यांनीही सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, संबंधित महिला पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न नेमका कोणत्या कारणामुळे केला, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते. मात्र, जिल्हा परिषदेतील एका सदस्याविरोधात तिने काही गंभीर आरोप केल्याची चर्चा सभागृहात सुरू होती. या संपूर्ण प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.