तीन दिवस धुवाधार सरी! महाराष्ट्रात मोठा बदल, पंजाबराव डख यांचा अंदाज

मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी तो अद्याप तळकोकण परिसरातच अडकून असल्याचे चित्र आहे. मान्सूनची पुढील प्रगती मंदावली असून राज्यातील बहुतांश भागात अजूनही पावसाचा पत्ता नाही. काही ठिकाणी अजिबात पाऊस न पडल्याने उष्णतेत वाढ होत आहे आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.

पाऊस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी भारतीय हवामान विभागाने 22 तारखेपासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होईल असा अंदाज दिला होता. मात्र या अंदाजात बदल करण्यात आला असून आता पुढील 4 ते 5 दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन अंदाजानुसार 25 जूननंतर महाराष्ट्रात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वेगळा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते 22, 23 आणि 24 जून या कालावधीत राज्यात काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच 22 जूनपासून पावसाला पुन्हा सुरुवात होऊन 30 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पावसाची सुरुवात पूर्व विदर्भातून होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान खात्यानुसार यावर्षी पाऊस सरासरीच्या सुमारे 90 टक्के राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. पावसाच्या विलंबामुळे पेरण्याही रखडल्या असून शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
