सोशल मीडियावर ओळख, विवाहित महिलेला ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, पुण्यातील घटना…

शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या विवाहित महिलेसोबत धरणाच्या भिंतीवर एकत्रित काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याची रवानगी थेट येरवडा कारागृहात करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलीस सूत्रांनी दिली.
शशांक जोशी (वय ३८, रा. ओतूर, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित भटजीचे नाव असून पीडित महिलेने ओतूर पोलिसात स्वतः हजर राहून या भटजीविरुध्द तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ओतूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता पीडित विवाहित महिला व संशयित शशांक जोशी यांची सन २०२० मध्ये फेसबुक अकाउंटमार्फत ओळख झाली. त्यानंतर जोशी हा पीडितेस सतत फोन करू लागला. एकदा पीडित महिला व जोशी हे खुबी (ता. जुन्नर) येथील खिरेश्वरकडे जाणार्या रस्त्यावरील धरणाच्या बंधार्यावर असताना त्याने दोघांचे एकत्र फोटो काढले.
त्यानंतर जोशी याने वेळोवेळी आपल्या दोघांचे एकत्र काढलेले फोटो तुझ्या नवर्याला दाखवेल, अशी धमकी देऊन फोन करून भेटण्यास बोलवत असे. तसेच दुपारच्या सुमारास पीडितेचे पती घरातून बाहेर गेल्याचे बघून आरोपीने जबरदस्तीने घरात घुसून दोघांचे एकत्रित फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देऊन जोशीने फिर्यादीसोबत शरीरसंबंध ठेवले.
तसेच त्याबद्दल कुणास काही सांगितले तर आपले फोटो व्हायरल करेल, तसेच माझ्या जिवाचे बरे-वाईट करून घेईल अशी धमकी दिली. यानंतर पुन्हा पुन्हा भेटायचे आहे, असे जोशी म्हणू लागल्याने त्यास पीडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने फिर्यादीची आई, भाऊ, बहीण यांना देखील फोन करून त्रास दिला.
दरम्यान त्याचा मित्र तसेच पीडितेच्या पतीचे मित्र यांना देखील त्याने दोघांचे एकत्रित काढलेले फोटो पाठवले. अखेर या पीडित महिलेची सहनशीलता संपुष्टात आल्याने तिने सरळ पोलिसात तक्रार नोंदवून भटजीला जेलची हवा खायला पाठवल्याची चर्चा ओतूर गावात सुरू आहे.