पावसाचा जोर पुन्हा वाढणार! 24 राज्यांना आयएमडीचा हाय अलर्ट; महाराष्ट्राची स्थिती काय?


पुणे : भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यासाठी वर्तवलेला पावसाचा अंदाज मोठ्या प्रमाणात खरा ठरला आहे. ऑगस्टमध्ये देशातील अनेक भागांत पावसाने ओढ दिली. महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पिकांवर त्याचा परिणाम झाला असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मात्र आता पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशातील अनेक भागांत मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील 24 तासांत तब्बल 24 राज्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

80 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता

पावसासोबतच काही भागांत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 80 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून, नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समुद्रातही हवामान प्रतिकूल राहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी या काळात समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम देशाच्या पूर्वेकडील आणि मध्य भागातील काही राज्यांवर होण्याची शक्यता आहे. या भागांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील काही भागांतही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘या’ राज्यांना पावसाचा इशारा

पुढील 24 तासांत उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, गुजरात, महाराष्ट्र, त्रिपुरा, आसाम, नागालँड, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

काही भागांत जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात कुठे पावसाची शक्यता?

महाराष्ट्रातही काही भागांत पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज असून, काही भागांत जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

विदर्भातील काही भागांतही पावसाची शक्यता असून, राज्यातील उर्वरित भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!