रक्षाबंधनाहून परतताना काळाचा घाला! थेऊर फाट्यावर भरधाव ट्रकची तरुणाला धडक; ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू..


लोणी काळभोर : रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून रात्री घरी परतत असताना पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना थेऊर फाटा येथे घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता. ४) मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन हनुमंत सुरवसे (वय ३३, रा. दहावा मैल, वडकी, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पवन हे पुणे शहरात ‘झोमॅटो’मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत होते. याप्रकरणी त्यांचे साडू ज्ञानेश्वर शंकर रणदिवे (वय ३४, रा. कुंजीर गॅरेज, थेऊर फाटा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर रणदिवे आणि पवन सुरवसे हे ३१ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त कात्रज येथे नातेवाईकांकडे गेले होते. तेथून १ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते रिक्षाने हडपसर येथे आले. मात्र, रात्री वडकीकडे जाण्यासाठी वाहन उपलब्ध न झाल्याने त्यांनी थेऊर फाट्यावरील कुंजीर गॅरेज येथे रात्र घालवण्याचे ठरवले.

रात्री अडीचच्या सुमारास दोघे एका पिकअप वाहनातून थेऊर फाट्यापुढे कुंजीर गॅरेजसमोर उतरले. गॅरेजकडे जाण्यासाठी ते पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत असताना सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात ट्रकने पवन यांना धडक दिली. धडकेनंतर चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला.

या अपघातात पवन यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. ते रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडले. ज्ञानेश्वर रणदिवे यांनी तत्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. चार दिवस उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, भरधाव वेगाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेळके पुढील तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!