डीजेवरून रण पेटलेलं असतानाच विद्यानंद बापटांचा नेत्यांना थेट सवाल; सभा-मिरवणुकीतही ‘ध्वनीप्रदूषण’ नको, केली मोठी मागणी


पुणे : सण-उत्सवांमध्ये डीजेच्या वापरावरून राज्यात वातावरण तापलेलं असतानाच सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी आता राजकीय कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. डीजेविरोधात भूमिका घेतल्यानंतर बापट यांनी राजकीय नेत्यांच्या सभा, मिरवणुका, लग्नकार्य आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही मोठ्या आवाजावर निर्बंध असावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेने आता राजकीय वर्तुळाचंही लक्ष वेधलं आहे.

बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला काहींचा विरोध होत असला, तरी काही नागरिकांकडून त्यांचं समर्थनही केलं जात आहे. मात्र, आपण डीजेविरोधात टोकाची भूमिका घेत नसून ध्वनीप्रदूषणाच्या समस्येवर उपाय सुचवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

निवडून येणाऱ्या नेत्यांना आनंद साजरा करण्याचा अधिकार आहे; मात्र सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजामुळे इतरांना त्रास होत असेल तर ते योग्य नाही, असं बापट यांनी म्हटलं. उत्सव किंवा लग्नकार्यामध्ये एका ठिकाणी डीजे वाजल्यानंतर दुसऱ्या ठिकाणीही मोठ्या आवाजाची स्पर्धा सुरू होते. त्यामुळे या पद्धतीत काळानुसार बदल होण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘तुमचा आनंद इतरांसाठी शिक्षा नको’

“तुमचा आनंद हा इतरांसाठी शिक्षा नसायला हवा,” असं म्हणत बापट यांनी डीजेच्या आरोग्यावरील परिणामांचाही मुद्दा उपस्थित केला. डीजेमुळे नागरिकांच्या कानांना आणि छातीला त्रास होतो, ही बाब निर्विवाद असल्याचं त्यांनी म्हटलं. उत्सव हे काळानुरूप आणि कोणाच्याही त्रासाचं कारण न ठरणारे असावेत, अशी त्यांची भूमिका आहे.

सध्याचे उत्सव ज्या पद्धतीने साजरे होतात, तेच उत्सव कायम राहिले पाहिजेत आणि त्यात बदल होऊ शकत नाही, असा नरेटिव्ह तयार केला जात असल्याचंही बापट म्हणाले. मात्र, काळानुसार बदल होणं ही विज्ञानाची बाब आहे, त्यामुळे चर्चेतून मार्ग काढता येऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी बापट यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या संतोष चव्हाण यांना संग्राम भंडारे यांनी सोन्याचे कडे दिल्याचाही दावा केला. हे प्रसिद्धीसाठी केलं जात असल्याचं आपल्याला माहिती असल्याचं सांगत, “मला माझं काम करायचं आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून आपला नाचतानाचा व्हिडिओ तयार करून दाखवला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, असा व्हिडिओ पाहताना नागरिकांनी सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवावी, असं आवाहन त्यांनी केलं.

मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरे करण्याबाबत भूमिका मांडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यास आणि चर्चेतून निर्णय घेतल्यास या प्रश्नावर तोडगा निघू शकतो, असं बापट यांनी म्हटलं. त्यामुळे डीजेविरोधातील त्यांची भूमिका आता थेट राजकीय सभा आणि मिरवणुकांपर्यंत पोहोचल्याने या मागणीवर पुढे काय चर्चा होते, याकडे लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!