व्हॉट्सॲपचा चॅटिंग लूक बदलणार! आयफोन युजर्ससाठी आले ५ भन्नाट चॅट थीम्स; असा बदला तुमचा चॅटचा अंदाज


पुणे : व्हॉट्सॲपवर रोज तासन्‌तास चॅटिंग करणाऱ्या युजर्ससाठी कंपनीने एक खास अपडेट आणलं आहे. आतापर्यंत एकसारख्या लूकमध्ये दिसणाऱ्या चॅट स्क्रीनला आता आपल्या आवडीनुसार वेगळा अंदाज देता येणार आहे. व्हॉट्सॲपने ‘चॅट थीम्स’ आणि ‘वॉलपेपर्स’ या फीचरला सुरुवात केली असून, सुरुवातीच्या टप्प्यात याचा लाभ आयफोन युजर्सना मिळत आहे.

व्हॉट्सॲपकडून युजर्सचा अनुभव अधिक आकर्षक करण्यासाठी सातत्याने नवे पर्याय आणले जातात. नव्या चॅट थीम्समुळे चॅटिंग करताना दिसणाऱ्या स्क्रीनचा लूक बदलता येणार आहे. म्हणजेच, आता केवळ प्रोफाइल फोटो किंवा स्टेटसच नाही, तर चॅटिंगची स्क्रीनही आपल्या पसंतीनुसार कस्टमाईझ करता येईल.

एक नाही, तब्बल ५ प्रकारच्या थीम्स

नव्या फीचरमध्ये युजर्ससाठी ‘फीचर्ड’, ‘नेचर’, ‘लाईव्ह’, ‘मिनिमल’ आणि ‘डूडल’ अशा पाच वेगवेगळ्या कॅटेगरी देण्यात आल्या आहेत. प्रत्येक थीमची डिझाईन, रंग आणि शैली वेगळी असल्यामुळे युजर्सना त्यांच्या आवडीचा पर्याय निवडता येणार आहे.

यापैकी ‘लाईव्ह’ थीम विशेष लक्षवेधी आहे. यामध्ये स्लो ॲनिमेशन असलेले वॉलपेपर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे चॅट स्क्रीनला अधिक जिवंत आणि आकर्षक स्वरूप मिळतं. निसर्गरम्य दृश्य आणि शांत रंग आवडणाऱ्यांसाठी ‘नेचर’ कॅटेगरी आहे.

ज्यांना साधा, स्वच्छ आणि डोळ्यांना आरामदायी लूक पसंत आहे, त्यांच्यासाठी ‘मिनिमल’ थीम उपयोगी ठरणार आहे. तर वेगळ्या आणि मजेशीर डिझाईन्स आवडणाऱ्यांसाठी ‘डूडल’ कॅटेगरीमध्ये पर्याय आहेत. याशिवाय ‘फीचर्ड’मध्ये निवडक आकर्षक डिझाईन्स पाहायला मिळतील.

आयफोनमध्ये कसं मिळणार फीचर?

आयफोन युजर्सना व्हॉट्सॲपच्या ‘चॅट थीम’ सेटिंगमध्ये जाऊन उपलब्ध पर्यायांमधून आवडती थीम आणि वॉलपेपर निवडता येईल. त्यामुळे चॅटिंग स्क्रीनचा लूक काही क्षणांत बदलता येणार आहे.

मात्र, अँड्रॉइड युजर्ससाठी सध्या प्रतीक्षाच आहे. हे फीचर अँड्रॉइडवर कधी उपलब्ध होईल, याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

दरम्यान, आयफोन वापरत असूनही ज्यांना हा पर्याय अद्याप दिसत नाही, त्यांनी व्हॉट्सॲपचं नवीनतम अपडेट उपलब्ध आहे का, हे तपासावं. अपडेटनंतरही फीचर न दिसल्यास ते टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत असण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!