ज्या प्रकारे तुझ्या बापाची…, माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी, कोणी दिली धमकी?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याच्या ई-मेलद्वारे धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. . झिशान सिद्दिकी यांचे वडील माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गेल्यावर्षी कुख्यात बिश्नोई टोळीच्या गुंडांनी हत्या केली होती.
त्यानंतर त्यांचे पूत्र झिशान यांना संरक्षण देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता त्यांना धमक्या आल्याने खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दिकी यांना आलेल्या या धमकीत ‘डी कंपनी’चे नाव असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
बाबा सिद्दिकी यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्या प्रकारे तुझी हत्या करण्यात येईल असा धमकीचा मेल झिशान सिद्दिकी यांना पाठवण्यात आला आहे. झिशान सिद्दिकी यांच्याकडून याबाबत मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
डी गँग चा उल्लेख करत जे हाल तुझ्या वडिलांचे केले तेच तुझे करू असा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे. झिशान सिद्दिकी यांना गेल्या २ दिवसांपासून धमकीचे मेल येत असल्याची माहिती आहे. या मेलमध्ये १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. रिमायंडर साठी प्रत्येकी ६ तासांनंतर मेल करणार असल्याचा उल्लेख आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून झिशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या त्यांच्या घराभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील खेरवाडी येथे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयासमोर तीन मारेकऱ्यांनी अत्यंत जवळून गोळीबार केला होता. या घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ही हत्या कुख्यात बिश्नोई टोळीने केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर झिशान सिद्दिकी यांना पोलिसांकडून विशेष सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र आता जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर हे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.