विश्वासघाताचा कळस! गुंगीचं औषध पाजून पतीनंच केलं मित्राच्या हवाली, दीर-मामानंही नाही सोडलं; छत्रपती संभाजीनगर हादरलं


छत्रपती संभाजीनगर : पत्नीसोबत सुखाचा संसार करण्याचं वचन देणारा पतीच तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू ठरल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे. पतीने पत्नीला गुंगीचं औषध पाजून मित्राच्या हवाली केल्याचा आणि तिच्यावर अत्याचार घडवून आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर या अमानुष कृत्याचे व्हिडिओ आणि फोटो काढून पीडितेला ब्लॅकमेल करण्यात आल्याचंही समोर आलं आहे.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात पती, दीर, सासू, सासरे, पतीचा मामा, मित्र रिजवान आणि समीर अशा सात जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने आधीच पत्नीला जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. त्याने नोट्स लिहिण्याच्या बहाण्याने आपला मित्र रिजवान याला पत्नीचा मोबाईल क्रमांक दिला. त्यानंतर रिजवान पीडित महिलेला वारंवार फोन करून त्रास देऊ लागला. ही बाब महिलेने पती आणि सासरच्या मंडळींच्या निदर्शनास आणून दिली. मात्र तिची बाजू घेण्याऐवजी सासरच्यांनीच आरोपी मित्राला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, ६ एप्रिल रोजी पती पत्नीला संजयनगर परिसरात घेऊन गेला. तेथे तिला कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध देण्यात आलं. तब्येत बिघडल्यानंतर पतीने तातडीचं काम असल्याचं सांगून तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर त्याचा मित्र रिजवान तेथे आला आणि पीडितेला एका हॉटेलमध्ये घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पीडितेला शुद्ध आल्यानंतर रिजवानने तिच्या पतीच्या सांगण्यावरूनच हे सर्व केल्याचं सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

याचदरम्यान पीडित महिलेने मदतीसाठी दिराकडे धाव घेतली. मात्र त्याने मदत करण्याऐवजी आणखी एका व्यक्तीसोबत मिळून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकाराची माहिती सासरच्या मंडळींनाही होती. तरीही त्यांनी आरोपींना पाठीशी घालत पीडितेला आणि तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

बदनामीच्या भीतीने काही काळ गप्प राहिलेल्या पीडितेने अखेर धैर्य एकवटून आपल्या आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिने जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सात जणांविरोधात विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!