बळीराजाचा तिजोरीवर पहिला हक्क! दुष्काळाच्या संकटात एकनाथ शिंदेंचा मोठा शब्द; पंचनाम्यांनंतर युद्धपातळीवर मदत, म्हणाले ‘दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही’


मुंबई : राज्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगाम अडचणीत आला असून मराठवाडा आणि विदर्भासह अनेक भागांतील शेतकरी संकटात सापडला आहे. पिकांचे नुकसान झाल्याने सरकारकडून मदतीची अपेक्षा असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात येणार असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना युद्धपातळीवर मदत दिली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमरावती आणि अकोला विभागाचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेच्या मंत्र्यांनाही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘बळीराजा हा अन्नदाता आहे. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे,’ असं शिंदे यांनी म्हटलं. अतिवृष्टी आणि गारपिटीच्या संकटात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं असून, यापूर्वीही मदत करण्यात आली आहे. यावेळीही पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदतीला विलंब केला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळीचा सण संकटात जाऊ देणार नाही, असं आश्वासनही शिंदे यांनी दिलं. बैठकीत शेतकऱ्यांच्या परिस्थितीची दखल घेण्यात आली असून, निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असली तरी दुष्काळ जाहीर झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. सोशल मीडियावर दुष्काळ जाहीर झाल्याची यादी फिरत असली तरी ती खोटी असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारकडून परिस्थितीचा टप्प्याटप्प्याने आढावा घेतला जात असून ५ ऑक्टोबरनंतर पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू होणार असल्याची ताजी माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी आणि त्यांच्या प्रश्नांवर विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष पंचनामे कधी पूर्ण होतात आणि त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार कोणती मदत जाहीर करतं, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!