सणांच्या मिरवणुकीत फटाक्यांचा आवाज आता बंद! मुंबई हायकोर्टाचा कडक आदेश; नियम मोडल्यास थेट कारवाई

मुंबई : गणेशोत्सव आणि धार्मिक सणांच्या काळात होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून, मिरवणुकांमध्ये निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नियम मोडणारी ध्वनीवर्धक उपकरणे जप्त करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने ध्वनी प्रदूषणाच्या प्रश्नाची स्वतःहून दखल घेतली. सण आणि मिरवणुका साजऱ्या करण्यास आक्षेप नसला, तरी त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होता कामा नये, अशी भूमिका न्यायालयाने मांडली. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि आजारी व्यक्तींना मोठ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागतो, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडल्याने केवळ ध्वनी प्रदूषणच नाही, तर वायू प्रदूषण आणि अपघाताचा धोकाही निर्माण होतो, असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे उत्सवांच्या काळात रस्त्यांवर फटाके फोडण्यास परवानगी देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.


डीजे आणि ध्वनीवर्धकांवरही लक्ष
मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात डीजे, ध्वनीवर्धक किंवा इतर साधनांचा वापर करण्याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. नियमांनुसार ध्वनीवर्धक आणि ध्वनीवर्धित संगीतासाठी असलेल्या वेळेच्या मर्यादेचे पालन होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मध्यरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यास परवानगी कशी दिली जाते, असा सवालही खंडपीठाने केला.
राज्य सरकारने न्यायालयात आपली बाजू मांडताना मिरवणुकांना परवानगी असली तरी ध्वनीवर्धकांच्या वापरासाठी नियम लागू असल्याचे स्पष्ट केले. तसेच मिरवणुकांमध्ये फटाके आणि लेझर दिवे वापरण्यास परवानगी नसल्याचेही सरकारने सांगितले.
परवानगी मंडळांना दाखवावी लागणार
उत्सव किंवा मिरवणुकीसाठी प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली असल्यास ती परवानगी संबंधित मंडळांनी सार्वजनिकपणे दर्शवणे बंधनकारक असेल. परवानगी प्रदर्शित केली नसेल, तर ध्वनीवर्धक वापरता येणार नाही. भविष्यात परवानगी देताना अनामत रक्कम घेण्याचा विचार करावा आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास ती रक्कम जप्त करावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली.
ढोल-ताशा पथकांमध्ये हातोड्याने वाजवण्यात येणाऱ्या सिलेंडरसदृश उपकरणांच्या वापराबाबतही न्यायालयाने बंदीचे निर्देश दिले आहेत.
९१ पोलीस ठाण्यांच्या कारवाईवरही सवाल
मुंबईत ९१ पोलीस ठाणी असून भरारी पथकांमार्फत नियमभंगावर कारवाई केली जाते, अशी माहिती राज्य सरकारने न्यायालयाला दिली. मात्र नियम आणि कायदे अस्तित्वात असूनही प्रत्यक्षात ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी का कायम आहेत, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. केवळ कागदावर आदेश असण्यापेक्षा त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या भूमिकेतून स्पष्ट झाले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने पंढरपूरच्या वारीचे उदाहरणही दिले. हजारो भाविक सहभागी होत असतानाही टाळ-मृदुंगाच्या साथीने वारी शांततेत पार पडते, मग इतर मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजाची गरज काय, असा मुद्दा न्यायालयाने उपस्थित केला.
या आदेशामुळे मुंबईतील आगामी धार्मिक सण आणि मिरवणुकांमध्ये फटाके, ध्वनीवर्धक, डीजे आणि इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या साधनांच्या वापरावर प्रशासनाला अधिक काटेकोरपणे नियंत्रण ठेवावे लागणार आहे.