पाच नगरसेवकांच्या बंडखोरीने शिरूरच्या सत्तेचा खेळच पालटला! राष्ट्रवादीला धक्का, भाजपच्या नितीन पाचर्णेंची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध बाजी

शिरूर : शिरूर नगर परिषदेतील सत्तेच्या राजकारणात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि पाच नगरसेवकांनी घेतलेली बंडखोरीची भूमिका भाजपच्या पथ्यावर पडली आहे. भाजपचे गटनेते आणि नगरसेवक नितीन मच्छिंद्र पाचर्णे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या प्रक्रियेत विरोधी उमेदवारीची शक्यता निर्माण झाली होती; मात्र ऐनवेळी दोन नगरसेविकांनी अर्ज दाखल न केल्याने पाचर्णे यांचा मार्ग सुकर झाला.

डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजपला ११, राष्ट्रवादी काँग्रेसला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पाच जागा मिळाल्या होत्या. सत्तास्थापनेसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत ‘शिरूर नगर परिषद गट’ स्थापन केला. या माध्यमातून शरद पवार गटाचे मितेश गादिया यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. मात्र, पुढील वर्षभरात दोन्ही गटांमधील मतभेद वाढत गेले. अखेर शरद पवार गटाच्या पाच नगरसेवकांनी सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली आणि नगर परिषदेतील सत्तेचे समीकरण बदलू लागले.
या राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी आमदार माऊली कटके, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, नितीन पाचर्णे आणि नगरसेवक अभिजीत पाचर्णे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर भाजपने सत्ताधारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित १८ नगरसेवकांनी तत्कालीन उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला. हा ठराव २० मतांनी मंजूर झाल्याने गादिया यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.

रिक्त झालेल्या पदासाठी नगर परिषद कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. नितीन पाचर्णे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉ. सुनीता पोटे आणि स्वप्नाली जामदार यांनीही अर्ज घेतल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र, पाचर्णे यांच्या विनंतीनंतर दोघींनीही अर्ज दाखल केले नाहीत. परिणामी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विठ्ठल जोशी यांनी पाचर्णे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

निकाल जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘महायुती झिंदाबाद’ आणि दिवंगत लोकनेते बाबूराव पाचर्णे यांच्या नावाने घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रांताधिकारी विठ्ठल जोशी आणि मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचा सन्मान केला. भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे यांनीही पुष्पहार घालून सत्कार केला.
यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. धर्मेंद्र खांडरे, जिल्हा सरचिटणीस भगवानराव शेळके, तालुका संपर्कप्रमुख ॲड. बाबूराव पाचंगे, माजी सैनिक बोर्ड अध्यक्ष बी. जी. पाचर्णे, एकनाथ शेलार, अविनाश जाधव आणि केशव लोखंडे उपस्थित होते. नगरसेवक संतोष थेऊरकर यांनी सूत्रसंचालन केले. सत्कारानंतर शहरातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मच्छिंद्र कटके, अमित गोते, जयेश शिंदे, प्रा. अशोक शेळके, कैलास सोनवणे, वर्षाताई काळे आणि जगदीश पाचर्णे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना नितीन पाचर्णे यांनी शहराचा विकास हाच आपला मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. आमदार माऊली कटके, उद्योगपती प्रकाश धारिवाल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद आणि तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुन्हा एकत्र आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या निवडीमुळे लोकनेते दिवंगत बाबूराव पाचर्णे यांनी पाहिलेले नगर परिषदेवरील संपूर्ण सत्तेचे स्वप्न साकार झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
