बोगस पोलीस भरतीचा पर्दाफाश केला अन् काही दिवसांतच वैभवचा मृत्यू! व्हायरल ऑडिओमधून जीवाला धोका असल्याची भीती; बीडमध्ये नेमकं काय घडलं?

बीड : पोलीस भरतीतील खेळाडू कोट्याच्या बोगस प्रमाणपत्रांचा पर्दाफाश करणाऱ्या २४ वर्षीय वैभव चव्हाणचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ज्या गैरप्रकाराविरोधात वैभवने आवाज उठवला, त्याच प्रकरणानंतर त्याने आपल्या आणि मित्राच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. त्याचा ध्वनिमुद्रित संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. आता त्याच वैभवचा इमामपूर शिवारात मृतदेह आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप घातपाताला दुजोरा दिलेला नाही.

बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण हा कराटे खेळाडू होता. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये त्याने सहभाग घेतला होता. त्याच्याकडे अधिकृत क्रीडा प्रमाणपत्रेही होती. २०२४-२५ मध्ये झालेल्या धाराशिव पोलीस भरतीसाठी त्याने खेळाडू कोट्यातून अर्ज केला होता. प्रतीक्षा यादीत असताना त्याच्या पुढील उमेदवाराने बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा संशय वैभवला आला. त्यानंतर त्याने या गैरप्रकाराविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
वैभवने पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा आयुक्तालयाकडे या प्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर कुराश असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव आणि काही जिल्हाध्यक्षांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली. पुण्यात पोलीस भरतीत निवड झालेल्या १९ जणांपैकी कर्तव्यावर असलेल्या नऊ पोलिसांना अटक होऊन तुरुंगात जावे लागले होते. त्यामुळे या तक्रारीने बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या रॅकेटची व्याप्ती चर्चेत आली होती.

मात्र, या प्रकरणाचा पाठपुरावा करत असतानाच वैभवने एक धक्कादायक संदेश प्रसारित केला होता. बोगस प्रमाणपत्रांच्या रॅकेटकडून आपल्यासह मित्राच्या जीवाला धोका असल्याचे त्याने या ध्वनिमुद्रित संदेशात सांगितले होते. हा संदेश समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर या संदेशाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

गुरुवारी इमामपूर शिवारात वैभवचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. वैभवचा भाऊ गणेश चव्हाण आणि नातेवाईकांनी त्याच्या शरीरावर, कमरेजवळ तसेच पायांवर जखमा आणि मारहाणीचे निशाण असल्याचा आरोप केला. हा साधा अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते हनुमंत धायगुडे आणि महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. पोलीस भरतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रांचा वापर करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. वैभवच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी या प्रकरणातील तपासाची माहिती दिली. घटनास्थळ पंचनामा आणि उपलब्ध प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार वैभवला थेट मारहाण झाल्याचे सध्या निष्पन्न होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी दोन पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैभवच्या मोबाईलमधील माहिती हटवण्यात आली असली, तरी ती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तपासात कोणाचाही सहभाग आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
गुरुवारी रात्री उशिरा नवगण राजुरी येथे पोलीस बंदोबस्तात वैभववर अंत्यसंस्कार करण्यात आले. बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट उघड करणारा तरुण मृतावस्थेत सापडल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. वैभवचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? त्याने व्यक्त केलेल्या जीवाच्या धोक्याच्या भीतीचा या घटनेशी काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत.
