आरक्षणाचा मुद्दा पेटला ; मराठा समाजाचं 10 टक्के स्वतंत्र आरक्षण रद्द करायचं का? भुजबळांच्या सवालाला जरांगेंचे चोख प्रत्युत्तर..

पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आमरण उपोषणानंतर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा जीआर काढला आहे. हा जीआर काढल्यानंतर आता पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा समाज समोरासमोर आले आहेत. या गॅझेटवर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र मराठा आरक्षण नको का? असा सवाल भुजबळांनी केला आहे. यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

यावर बोलताना ते म्हणाले, मी अशिक्षित असो किंवा शिक्षित असू तुम्हाला तर रडकुंडीला आणलं ना? तुमचा जो उद्देश होता, मराठा समाजाला आरक्षण मिळू न द्यायचा, त्याच्यावर तर मी पाणी फेरलं. मराठा समाजाला आरक्षण मिळालं, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रही आरक्षणात गेला, असं जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.दुसरीकडे जीआर हा कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारा आहे, या जीआरमुळे कुठेही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या भूमिकेवर मंत्री भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको का? असा सवाल भुजबळांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला दिलेलं स्वतंत्र दहा टक्के आरक्षण नकोय का? ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर ईडब्ल्यूएसमध्ये ही तुम्हाला आरक्षण आहे ते पण तुम्हाला नकोच का? असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर आता जरांगे पाटील यांनी उत्तर दिल आहे.
