पेरणी कधी करायची? शेतकऱ्यांसाठी आली मोठी गुड न्यूज; मान्सूनकडून मिळतोय सकारात्मक संकेत, काय आहे हवामान विभागाचा नवीन अपडेट?


मुंबई : अखेर देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला असून मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. आता पुढील काही दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून येत्या 48 तासांत काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कमी पावसात घाईघाईने पेरणी केल्यास पिकांचे नुकसान होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यात यंदा सुमारे 6.47 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी अपेक्षित असून गेल्या वर्षाच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. कापूस आणि सोयाबीन हीच पिके यंदाही शेतकऱ्यांची प्रमुख पसंती ठरत आहेत.

साताऱ्यात पावसाची प्रतीक्षा

सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी पूर्ण केली असली तरी मान्सूनपूर्व पाऊस न पडल्याने मशागतीची कामे रखडली आहेत. पाण्याची पातळी घटल्यामुळे ऊस पिकालाही फटका बसत असल्याचे चित्र आहे.

बीडमध्ये युरिया खताचा तुटवडा

परळी तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मान्सून जवळ आल्याने खत व बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. मात्र वाढलेल्या किमती आणि खतांच्या उपलब्धतेचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

सोयाबीन बियाण्यांबाबत कृषी विभागाचा सल्ला

वाशिम जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाण्यांचा साठा करून ठेवला आहे. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासावी, असे कृषी विभागाने सांगितले आहे. 100 बियाण्यांपैकी किमान 70 बियाणे उगवल्यास ते पेरणीसाठी योग्य मानले जाते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!