कोर्टातून परतला अन् येरवड्याच्या कारागृहात झाला पर्दाफाश! सराईत कैद्याकडे सापडला गांजा; न्यायालय परिसरातील ‘त्या’ भेटीचा तपास सुरू

पुणे : न्यायालयीन सुनावणी आटोपून येरवडा मध्यवर्ती कारागृहात परतलेल्या एका सराईत कैद्याकडे गांजा आढळल्याने कारागृह प्रशासन आणि पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. प्रवेशावेळी करण्यात आलेल्या नियमित तपासणीत हा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे न्यायालयातून परतल्यानंतर काही मिनिटांतच अमली पदार्थ सापडल्याने तो कारागृहात पोहोचण्यापूर्वीच कोणीतरी त्याला गांजा पुरवल्याचा संशय अधिक बळावला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता येरवडा पोलीस करत आहेत.

या प्रकरणातील आरोपी निहालसिंग मुन्नासिंग टाक (वय २१, रा. हडपसर) हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असून सध्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहे. घरफोडी, लूटमार यांसारख्या गुन्ह्यांसह काही महिन्यांपूर्वी हडपसर परिसरात एका सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणीही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असून त्याला वानवडी पोलिसांनी अटक केली होती.
१८ जुलै रोजी न्यायालयीन कामकाजासाठी निहालसिंगला कारागृहातून न्यायालयात नेण्यात आले होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दुपारी सुमारे पावणेदोनच्या सुमारास तो पुन्हा येरवडा कारागृहात दाखल झाला. कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी सर्व कैद्यांप्रमाणे त्याचीही सखोल झडती घेण्यात आली. या तपासणीत त्याच्याकडून सुमारे १२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या अमली पदार्थाची अंदाजे किंमत ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच कारागृहातील रक्षक समाधान हत्तीकर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार निहालसिंगविरुद्ध अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनीही कारागृहाला भेट देत संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.

तपास यंत्रणेला प्राथमिक चौकशीत न्यायालय परिसरात आरोपीच्या ओळखीतील काही व्यक्तींनी त्याच्याकडे गांजाची पुडी दिल्याचा संशय आहे. त्यामुळे त्या दिवशी न्यायालय परिसरात त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू असून सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. कारागृहात प्रतिबंधित वस्तू पोहोचविण्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास केला जात आहे.
येरवडा कारागृहात यापूर्वीही कैद्यांकडून मोबाईल, गांजा आणि अन्य प्रतिबंधित वस्तू जप्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाने सीसीटीव्ही यंत्रणा, झडती आणि सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा केल्या असल्या तरी न्यायालयीन कामकाजासाठी बाहेर जाणाऱ्या कैद्यांच्या हालचालींवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
या प्रकरणामुळे न्यायालय ते कारागृह या प्रवासादरम्यान सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपीला अमली पदार्थ नेमका कोणी आणि कसा पुरवला याचा उलगडा करण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.