पाटसमध्ये भरदिवसा तुफान राडा! दोन गट आमनेसामने; गावठी पिस्तूलातून 3 राऊंड फायर, परिसरात तणाव


दौंड : दौंड तालुक्यात शुक्रवारी भरदिवसा घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पाटस येथील गजबजलेल्या गडदरे कॉम्प्लेक्ससमोर दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. या घटनेत गावठी पिस्तूलातून तब्बल तीन राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, काष्टी येथील काही तरुण आणि पाटस येथील तरुण यांच्यात जुन्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. वाद वाढत गेल्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले आणि एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. काही वेळातच परिस्थिती अधिकच चिघळली आणि दोन्ही गटांतील काही जणांनी गावठी पिस्तूल काढून हवेत तसेच समोरासमोर गोळीबार केला.

भर चौकात अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

घटनास्थळावरून रिकामे काडतुसे जप्त करण्यात आली असून, गोळीबारासाठी नेमके कोणते शस्त्र वापरण्यात आले, त्यामागील कारण काय होते आणि यात कोण जखमी झाले का, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या घटनेनंतर पाटस परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

दरम्यान, दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुणे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यवत पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!