पुणे भाजपच्या शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? नाव ठरलं, आता फक्त घोषणा बाकी..

पुणे : काही दिवसांपूर्वी मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर आता शहर आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, नुकतेच यासाठी मतदान प्रक्रिया देखील पार पडली आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदासाठीच्या नावांची निवड पूर्ण झाली असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. भाजपकडून राज्यातील तब्बल ७८ शहर आणि जिल्हाध्यक्षांची नावे एकाच वेळी जाहीर होणार असून, त्यासाठी मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे.
पुणे शहराध्यक्ष पदासाठी सध्या भाजपचे विद्यमान अध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, राजेंद्र शेळीकर, गणेश घोष आणि राजेश पांडे ही नावे चर्चेत आहेत. महिला नेत्यांमध्ये माजी नगरसेविका वर्षा तापकीर, आरती कोंढरे आणि वर्षा डहाळे यांची नावे पुढे येत आहेत.
मात्र सर्वाधिक चर्चा ही गणेश बिडकर आणि श्रीनाथ भिमाले यांच्या नावाभोवती केंद्रित आहे. पक्षातील काही कार्यकर्त्यांनुसार, वरिष्ठांकडून गणेश बिडकर यांचं नाव शहराध्यक्षपदासाठी फायनल झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, त्यामुळे पुढील दोन दिवसांत अधिकृत घोषणा होऊन या चर्चांना पूर्णविराम मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपने यासाठी काही दिवसांपूर्वी परिवेक्षकांचीही नियुक्ती केली होती.