‘दोस्त’ निघाला मास्टरमाइंड! हॉटेलमध्ये मित्रांसोबत केली पार्टी, बाहेर पडताच रचला धक्कादायक कट


नवी मुंबई : खारघर परिसरात चाकूचा धाक दाखवत ५७ तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खारघर पोलिसांना मोठे यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, फिर्यादीचा जवळचा मित्रच या संपूर्ण कटाचा सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून, लुटलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत नामदेव मोरे हे बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून मित्रांसह कारने घरी परतत होते. खारघरमधील त्यांच्या घराजवळ पोहोचताच तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांची कार अडवली.

यानंतर आरोपींनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत सुशांत आणि त्यांच्या मित्रांवर हल्ला केला. झटापटीदरम्यान सुशांत यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आला. या गोंधळात आरोपींनी चालकाकडे असलेले तब्बल ५७ तोळे सोन्याचे दागिने हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले.

भरवस्तीत घडलेल्या या धाडसी लुटीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष तपास पथके तयार करण्यात आली.

तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयाची सुई सुशांत यांचा मित्र अभिनंदन माळी याच्याकडे वळवली. चौकशीदरम्यान माळी याने पत्नी, मेहुणा आणि गावातील काही साथीदारांच्या मदतीने ही लूट घडवून आणल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी सांगली, सातारा, सोलापूर आणि पंढरपूर परिसरात छापेमारी केली. मुख्य आरोपी पालखी

सोहळ्याच्या गर्दीत लपण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी सापळा रचत त्यांना पंढरपूरमधून ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून ५७ तोळे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेला चाकू, एक मारुती स्विफ्ट कार आणि रायडर मोटारसायकल जप्त केली आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, दोन आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. खारघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक डमाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!