हक्काच्या घराचं स्वप्न पडलं महागात! पुण्यात मायलेकांची 8.81 कोटींची फसवणूक, नेमकं घडलं काय?

पुणे : पुण्यात घराचे स्वप्न पाहणाऱ्या मायलेकांची तब्बल 8 कोटी 81 लाख 92 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा आणि त्याबदल्यात सममूल्य किमतीचे फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये ड्रीम्स कॉर्पोरेशनचे संचालक रमेश घिसुलाल मेहता, उमेश शशिकांत अंबेकर, हसमुख प्रकाश बोटीया आणि हितेश सुभाष लोंढा यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2009 ते मार्च 2017 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून तक्रारदार आणि त्यांच्या आईला बांधकाम प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवले. गुंतवणुकीवर मोठा आर्थिक परतावा मिळेल तसेच त्याबदल्यात फ्लॅट देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते.

या आश्वासनांवर विश्वास ठेवून मायलेकांनी वेळोवेळी एकूण 8 कोटी 81 लाख 92 हजार रुपये आरोपींकडे जमा केले. मात्र, तपासात ही रक्कम मुख्य आरोपी रमेश मेहता यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे.

विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी गुंतवणुकीच्या बदल्यात सममूल्य किमतीचे फ्लॅट देण्याबाबत नोटराइज सामंजस्य करारपत्रही करून दिले होते. मात्र, अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही ना फ्लॅटचा ताबा देण्यात आला, ना आर्थिक परतावा मिळाला. इतकेच नव्हे तर गुंतवलेली मूळ रक्कमही परत करण्यात आली नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर चतुःशृंगी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणामुळे बांधकाम प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करताना आवश्यक ती पडताळणी करणे किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.