शेतात गेले, पाऊस सुरू झाला अन् मंदिरात आसरा घेतला; सकाळी सापडले दोघांचे मृतदेह, नागपुरात वीजेच्या धक्क्याने दोन चुलत भावांचा अंत

नागपूर : जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेतात गेलेल्या दोन चुलत भावांवर वादळी पावसादरम्यान काळाने घाला घातला. पाऊस सुरू झाल्यानंतर दोघांनी गावातील मंदिरात आसरा घेतला असावा, मात्र त्याच ठिकाणी वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील तिष्टी खुर्द येथे घडली. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मृतांची नावे तिबुराज राजेराम कानफाडे (६४) आणि लक्ष्मण घनश्याम कानफाडे (५५) अशी आहेत. दोघेही चुलत भाऊ असून शेती व्यवसाय करत होते. शनिवारी रात्री जनावरांना पाणी पाजण्यासाठी ते शेतात गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. बाहेर वादळी पाऊस सुरू असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आणि त्यांनी दोघांचा शोध सुरू केला.

कुटुंबीय आणि नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता गावातील मंदिरात दोघेही मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर घटनेची माहिती मोहपा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.


पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री परिसरात जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता. पावसापासून बचाव करण्यासाठी दोन्ही शेतकऱ्यांनी मंदिरात आसरा घेतला असण्याची शक्यता आहे. याचदरम्यान वीज पडल्याने अथवा विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.
मोहपा पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, काही वेळापूर्वी जनावरांची देखभाल करण्यासाठी घराबाहेर पडलेले दोन्ही चुलत भाऊ पुन्हा घरी परतलेच नाहीत. त्यांचा मंदिरात मृतावस्थेत झालेला शोध लागल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तिष्टी खुर्द गावात या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.