वर्षानुवर्षे जपलेलं घर आता धोक्यात; मुंबईतील 39 हजार झोपड्यांवर पालिकेची नजर, 14 फुटांवरील बांधकामांवर कारवाई


मुंबई : घराची जागा वाढवण्यासाठी झोपडीवर मजला चढवला, उंची वाढवली आणि अनधिकृत बांधकाम केलं असेल, तर आता मुंबईत पालिकेची धडक कारवाई होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने झोपडपट्टी परिसरातील १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या अनधिकृत बांधकामांविरोधात विशेष मोहीम जाहीर केली आहे. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत ही कारवाई केली जाणार असून, संबंधित रहिवाशांनी त्याआधीच अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

पालिकेच्या आकडेवारीनुसार, बृहन्मुंबई क्षेत्रात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये एकूण २ लाख २३ हजार १५० झोपड्या आहेत. त्यापैकी तब्बल ३९ हजार १११ झोपड्या १४ फूट किंवा त्याहून अधिक उंचीच्या असल्याचे समोर आले आहे. या बांधकामांमध्ये मुंबई शहरातील ३ हजार ३४८, पश्चिम उपनगरांतील ४ हजार ५३६ आणि पूर्व उपनगरांतील तब्बल ३१ हजार २२७ झोपड्यांचा समावेश आहे. त्यामुळे या विशेष मोहिमेचा मोठा फटका पूर्व उपनगरांतील झोपडपट्टी भागांना बसण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचं म्हणजे, ही कारवाई थेट १ ऑक्टोबरपासूनच सुरू होणार असली तरी पालिकेने याआधीच काही बांधकामांवर कारवाई केली आहे. आतापर्यंत ४ हजार ५८४ झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून, आणखी ६११ झोपड्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित संबंधित रहिवाशांनीही अनधिकृत बांधकामे तातडीने स्वतःहून हटवावीत, अन्यथा पालिका प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहआयुक्त (दक्षता) देवेंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई केली जात आहे. झोपडपट्टी भागातील वाढीव आणि अनधिकृत बांधकामे हटवण्यावर या मोहिमेत विशेष भर राहणार आहे.

दरम्यान, मुंबईत अनधिकृत बांधकामांविरोधातील नियमित कारवाईही सुरू आहे. २४ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध प्रशासकीय विभागांमार्फत १२८ अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. याशिवाय आणखी १४० अनधिकृत बांधकामांवर कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

या कारवाईमागे सुरक्षेचाही मुद्दा महत्त्वाचा असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील काही भागांत अनधिकृत आणि असुरक्षित बांधकामांमुळे दुर्घटनांचा धोका निर्माण होत असल्याने पालिकेने अशा बांधकामांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आता १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या विशेष मोहिमेत १४ फुटांवरील किती बांधकामांवर प्रत्यक्ष हातोडा पडतो, याकडे मुंबईतील झोपडपट्टी भागातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!