शेतकरी दुष्काळात होरपळतोय, बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये रमले; कृषिमंत्र्यांसमोरच प्रकार, कारवाईचा इशारा


अकोला : शेतकऱ्यांच्या पिकांवर दुष्काळाचं सावट, मदतीसाठी प्रशासनाकडे अपेक्षेने पाहणारे शेतकरी आणि दुसरीकडे त्याच दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत काही अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं चित्र! अकोल्यातील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीत समोर आलेल्या या प्रकारामुळे चर्चेला उधाण आलं आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत काही अधिकारी मोबाईलवर समाजमाध्यमे आणि संदेश पाहण्यात दंग असल्याचा आरोप करण्यात आला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील दुष्काळी परिस्थितीवर आढावा बैठक झाली. यावेळी पिकांची स्थिती, पावसाची परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. मंत्री संजय राठोड, आकाश फुंडकर, अशोक उईके आणि इंद्रनील नाईक यांच्यासह राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ऑनलाइन सहभागी झाल्या. विभागातील सर्वपक्षीय खासदार आणि आमदारही बैठकीला उपस्थित होते.

एकीकडे लोकप्रतिनिधी दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीवर आपली भूमिका मांडत असताना काही अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दृश्य समोर आले. त्यामुळे कृषिमंत्र्यांनी बैठकीत दिलेल्या सूचना प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी किती गांभीर्याने घेतल्या, असा प्रश्न उपस्थित झाला. या प्रकाराची माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी भूमिका कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली.

काँग्रेस आमदार अमित झनक यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. दुष्काळाचा काळ अत्यंत कठीण असून, अशा बैठकीत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पूर्ण लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. कृषिमंत्री आणि इतर राज्यमंत्री उपस्थित असताना अधिकारी मोबाईल पाहण्यात व्यस्त असणे निंदनीय असल्याची प्रतिक्रिया झनक यांनी दिली.

दरम्यान, नांदेडमधील दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामाच्या चर्चेनंतर आता अकोल्यातील मोबाईल वापराच्या प्रकारामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या प्रकाराबाबत प्रत्यक्षात कोणती कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!