फाल्गुनी पाठकच्या दांडियात ‘नो एंट्री’चा वाद; मुस्लिमांच्या प्रवेशावर आमदार ठाम, आधारकार्ड तपासणीसह नेमके काय नियम?

फाल्गुनी पाठकच्या दांडियात ‘नो एंट्री’चा वाद; मुस्लिमांच्या प्रवेशावर आमदार ठाम, आधारकार्ड तपासणीसह नेमके काय नियम?नवरात्रीच्या गरबा-दांडियाला सुरुवात होण्याआधीच बोरीवलीतील मोठ्या गरबा महोत्सवावरून वादाची ठिणगी पडली आहे. फाल्गुनी पाठक आणि गीता रबारी यांच्या सादरीकरणामुळे चर्चेत असलेल्या या कार्यक्रमात मुस्लिमांच्या प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी मुस्लिमांना प्रवेश दिला जाणार नसल्याची भूमिका मांडली, तर आयोजकांनी सुरक्षेसाठी आधारकार्ड तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले.
बोरीवलीतील गरबा महोत्सवाच्या भूमिपूजन आणि पत्रकार परिषदेत आमदार संजय उपाध्याय, आमदार मनिषा चौधरी आणि माजी खासदार गोपाल शेट्टी उपस्थित होते. यावेळी मुस्लिमांच्या सहभागावरून उपाध्याय यांनी स्पष्ट भूमिका घेतली. गरब्यात सहभागी होण्यासाठी येणाऱ्यांनी कुटुंबासह यावे, टिळा लावावा आणि देवीची पूजा करावी, असे त्यांनी म्हटले. तसेच हा कार्यक्रम ‘लव्ह जिहाद’साठी नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

माजी खासदार गोपाल शेट्टी यांनीही यावेळी टिळ्याचा मुद्दा उपस्थित केला. मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू असल्याचा दावा करत, टिळा लावून येण्याबाबत त्यांनी वक्तव्य केले. दुसरीकडे, आयोजक संतोष सिंह यांनी कार्यक्रमात विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून, प्रवेशावेळी आधारकार्ड तपासले जाणार असल्याचे सांगितले.


या महोत्सवात गीता रबारी यांच्या गरब्याचे आयोजन करण्यात आले असून, २० सप्टेंबरला फाल्गुनी पाठक सादरीकरण करणार असल्याची माहिती आमदार मनिषा चौधरी यांनी दिली. बोरीवली हे मेट्रो आणि महामार्गाने सहज पोहोचता येणारे ठिकाण असल्याने मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील गरबा-दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावरून गेल्या काही दिवसांपासून व्यापक वाद सुरू आहे. विश्व हिंदू परिषदेनेही मुस्लिमांना प्रवेश न देण्याची मागणी करत ओळख पडताळणी आणि टिळ्याचा मुद्दा मांडला आहे. या भूमिकेला काही राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला असला, तरी अमृता फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी धार्मिक आधारावर प्रवेशबंदीच्या भूमिकेला विरोध केला आहे. त्यामुळे बोरीवलीतील गरबा महोत्सवातील प्रवेशाचे नियम आणि त्यावरून निर्माण झालेला वाद नवरात्रीपूर्वी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.