आधी मामाचा रक्तरंजित शेवट, मग भाच्यानेही गळफास घेतला; एकाच घरात दोन मृतदेह, चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण


पुणे : सकाळची नेहमीसारखी सुरुवात असलेल्या एका घरात काही तासांतच दोन मृतदेह सापडल्याने राजगुरुनगरच्या माधवनगर परिसरात खळबळ उडाली. आजारपणामुळे बहिणीच्या घरी उपचारासाठी राहणाऱ्या मामावर भाच्याने धारदार कोयत्याने हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना १९ सप्टेंबर रोजी घडली. संदीप वामन गडदे (४३) असे मृत्यू झालेल्या मामाचे, तर प्रवीण कैलास कोहिनकर (२०) असे भाच्याचे नाव आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संदीप गडदे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. अर्धांगवायूचा त्रास असल्याने उपचार आणि देखभालीसाठी ते सुमारे दोन महिन्यांपूर्वी माधवनगर येथे बहिणीच्या घरी आले होते. मात्र, आजारपणामुळे त्यांना मोठा त्रास होत होता. रात्री-अपरात्री त्यांचा आरडाओरडा होत असल्याने घरातील वातावरण तणावपूर्ण झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

घटनेच्या दिवशी प्रवीणने आधी आईला कामासाठी वाकी येथे सोडले. त्यानंतर आधारकार्ड घरी राहिल्याचे सांगत तो पुन्हा घरी आला. घरात पोहोचल्यानंतर त्याने दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर आजारी अवस्थेत असलेल्या मामावर कोयत्याने गळ्यावर आणि शरीरावर वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या हल्ल्यात संदीप गडदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मामावर हल्ला केल्यानंतर प्रवीणने त्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ घरातून हालचाल न झाल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. खेड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करताना पोलिसांच्या हाती प्रवीणने लिहिलेली चिठ्ठी लागली.

या चिठ्ठीत ‘मामाच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत आहे’, असा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे मामाच्या आजारपणामुळे निर्माण झालेला त्रास आणि घरातील तणाव या घटनेमागे कारणीभूत होते का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळावरील पुरावे, चिठ्ठी आणि इतर बाबींची पडताळणी सुरू असून, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!