शेकापच्या सरचिटणीसांना मारहाण प्रकरण भोवलं ; कोर्टाने ठरवलं दोषी, आर्थिक दंडासह दिली मोठी शिक्षा…

पुणे : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेल मारहाण प्रकरण चांगलंच भोवलं आहे. निवडणुकीदरम्यान जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्रात घुसून एका पत्रकाराला मारहाण केली होती.
याप्रकरणी अलिबागच्या कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे. कोर्टाने त्यांना पाच हजार रुपयांच्या आर्थिक दंडासह एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचं हमीपत्र देण्याची शिक्षा दिली आहे.

काय आहे प्रकरण?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी अलिबाग येथील मतमोजणी केंद्रात घुसून जयंत पाटील यांनी तुम्ही पत्रकार काहीही बातम्या छापता,असे म्हणत मारहाण केल्याचा आरोप होता. याप्रकरणी २४ मे २०१९ रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात जयंत पाटील, पंडीत उर्फ सुभाष पाटील आणि अभिजित कडवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान अलिबाग पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी तपास करून अलिबाग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम बी अत्तार यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. गेली सहा वर्षे चाललेल्या या सुनावणीदरम्यान एकूण १३ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. फिर्यादी, पंच आणि साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने माजी आमदार जयंत पाटील यांना भारतीय दंड विधान कलम ३२३ अन्वये दोषी ठरवले.

दरम्यान न्यायालयाने जयंत पाटील यांना तुरुंगात पाठवण्याऐवजी ‘अपराध प्रतिबंधक कायद्यानुसार’ एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमी पत्र लिहून देण्याचे आणि ५ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत
