दौंडमध्ये खळबळ उडवणाऱ्या अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी अखेर आरोपी अटकेत, आमदाराच्या भावासह तिघांना घेतलं ताब्यात…

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील बहुचर्चित कला केंद्रावर गोळी बार झाल्याची घटना नुकतीच समोर आली. त्यानंतर हे प्रकरण आमदार रोहित पवार यांनीही उचलून धरले आणि काल पलिसांना गुन्हा दाखल करावा लागला आहे.

तसेच आता दौंड तालुक्यातील वाखरी गावच्या हद्दीत असलेल्या न्यू अंबिका कला केंद्रात २१ जुलै ला मध्यरात्री झालेल्या गोळीबार प्रकरणातील चारपैकी तीन आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला आमदाराचा भाऊ पोलिसांनी अटक केला असून चंद्रकांत मारणे हा मात्र अद्याप सापडलेला नाही.
नेमकं घडलं काय?

२१ जुलैच्या रात्री साडेदहा अकराच्या सुमारास चौफुला जवळ असलेल्या आणि वाखरी येथील न्यू अंबिका केंद्रात लावणीची गाणी वाजवायची का डीजे ची गाणी वाजवायची ह्यावरून वाद झाला आणि या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. ही घटना संबंधित कला केंद्राच्या मालकांनी आणि कलाकारांनी लपवली होती. मात्र माध्यमांच्या जागृतीमुळे ही घटना बातमीच्या माध्यमातून उघडकीस आली. आणि पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली.

या घटनेत पुणे जिल्ह्यातील एका आमदाराचा भाऊ असल्याची चर्चा होती. त्यामुळे पोलीस हे प्रकरण दबावाखाली दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ही झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेत राज्य सरकारवर टीका केली होती.
गोळीबार प्रकरणातील आरोपींना मोकाट सोडणार का? असा सवाल त्यांनी केला होता. त्यानंतर मात्र पुढील प्रशासन वाऱ्यासारखा हलले आणि न्यू अंबिका कला केंद्रात जाऊन सखोल चौकशी केली असता ह्याच केंद्रात ही घटना घडल्याचे प्रकार उघड झाला. आणि पोलिसांनी या कला केंद्रातील व्यवस्थापकांना बोलते केले.
दरम्यान, २१ जुलै रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास अंबिका कला केंद्र येथे रेणुका दुर्गा रुईकर यांची पार्टी सुरू होती, ज्यामध्ये पाच महिला उपस्थित होत्या. साधारण ११.१५ वाजण्याच्या सुमारास मी गेटवर असताना आमचा कामगार युवराज चंदन धावत आला आणि सांगितले की, अंबिका जाधव हिला चक्कर येऊन ती खाली पडली आहे. मी त्वरित त्या ठिकाणी गेलो असता ती पडलेली आढळली, तिला लगेच दवाखान्यात पाठवले.
त्यानंतर चौकशी केली असता मला समजले की , आरोपी बाळासाहेब मांडेकर याने नाचताना अचानक बंदूक काढून हवेत गोळीबार केला. गोळी भिंती व छतावर आदळली. त्यामुळे आरोपी बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत असलेला एक अनोळखी इसम हे चौघे घाबरून गाडीतून निघून गेले.
त्यानंतर मी सदर ठिकाणी पाहणी केली असता भिंत व छतावर गोळी लागल्याचे ठसे दिसले आणि फरशीवर गोळीचा चपटा झालेला तुकडा सापडला, जो मी ताब्यात घेतला. अशी फिर्याद बाबासाहेब राजश्री अंधारे यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.