‘दादांसारखी मी नाही…’; सुनेत्रा पवारांच्या एका वाक्याने सोमेश्वरच्या निवडणुकीत खळबळ, नेमका इशारा कुणाला?

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या एका वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजपच्या साथीने स्वतंत्र पॅनल उभं करणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांचं नाव न घेता सुनेत्रा पवार यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. ‘दादा खूप मोठ्या मनाचे होते; पण मी दादांसारखी नाही. एकदा बाहेर ते कायमचे बाहेर,’ असं त्या म्हणाल्या.
सोमेश्वरच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर राष्ट्रवादीतूनच बंडखोरी झाल्याने लढतीकडे विशेष लक्ष लागलं आहे. पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या पाठिंब्याने पॅनल उभं केलं असून, माजी आमदार आणि भाजप नेते संजय जगतापही त्यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि जय पवार राष्ट्रवादीच्या पॅनलसाठी गावोगावी बैठका घेत मतदारांशी संपर्क साधत आहेत.

युगेंद्र पवार यांनीही शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. एका दिवसात तब्बल २० गावांचा दौरा करत ते मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे एकाच निवडणुकीत राष्ट्रवादीशी संबंधित तीन गट आमनेसामने आल्याचं चित्र आहे.


दरम्यान, कारखान्याच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या चर्चांनाही सुनेत्रा पवार यांनी उत्तर दिलं. अध्यक्ष कोण होणार हे आधीच निश्चित करण्यात आलेलं नाही. निवडणुकीचा निकाल आल्यानंतर सर्वांच्या मर्जीनुसार आणि सर्वसमावेशक पद्धतीने अध्यक्षाची निवड केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आधीच नाव निश्चित असल्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावलं.
‘सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. मन दुखवून पुढे काय होणार, कोण जवळ येणार, अशा अनेक अफवा आहेत. कुठल्याही चुकीच्या अफवांना बळी पडू नका. अनेक गोष्टी ऐकायला मिळतात, मात्र त्या अफवाच आहेत,’ असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. तसेच ‘माझ्यावर विश्वास ठेवा,’ असं आवाहनही त्यांनी केलं.
निवडणुकीला आता निर्णायक वळण आलं असून प्रचारासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. जाहीर सभांपेक्षा मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेण्यावर सर्वच पॅनलचा भर आहे. ९ ऑक्टोबरला प्रचाराची सांगता होणार असून, ११ ऑक्टोबरला कारखान्याच्या २१ जागांसाठी मतदान होईल. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या इशाऱ्यानंतर पुरुषोत्तम जगताप गटाकडून काय प्रतिक्रिया येते आणि या तिरंगी लढतीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याची उत्सुकता वाढली आहे.
