सुनेत्रा पवारांचा खासदारकीचा राजीनामा; बारामतीतील ऐतिहासिक विजयानंतर मोठा राजकीय निर्णय


पुणे : राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांनी अधिकृत राजीनामा सादर केला. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. मात्र बारामती पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी मिळालेल्या विजयानंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला.

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली. त्यानंतर झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत त्यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या विरोधातील २२ उमेदवार आणि ‘नोटा’ मिळून केवळ ४८३७ मते मिळाली. हा निकाल पूर्णपणे एकतर्फी ठरला आणि अजित पवार यांनी २०१९ मध्ये केलेला मताधिक्याचा विक्रमही मोडीत निघाला.

नियमानुसार, दोन वेगवेगळ्या सभागृहात निवडून आलेल्या व्यक्तीला १४ दिवसांच्या आत एक पद सोडणे बंधनकारक असते. त्यामुळे निकाल जाहीर होताच त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली असून लवकरच पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. या जागेवर कोणाची निवड होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनीही राज्यसभेची शपथ घेतली असून पवार कुटुंबाचा राजकीय प्रभाव अधिक वाढताना दिसत आहे. सुनेत्रा पवार यांच्या या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!