शिरसाई सिंचन योजनेच्या आंदोलकांना सुनेत्रा पवारांचा शब्द! चौथ्या दिवशी उपोषण मागे, पाण्याबाबत मोठे आश्वासन


बारामती : बारामती तालुक्यातील शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी उंडवडी सुपे येथे सुरू असलेल्या बेमुदत चक्री उपोषणाची अखेर चौथ्या दिवशी सांगता झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

२०० दशलक्ष घनफूट पाण्यासाठी प्रयत्न करणार

शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर असलेले १६० दशलक्ष घनफूट पाणी आणि मागील आवर्तनातील शिल्लक ४० दशलक्ष घनफूट पाणी, असे एकूण किमान २०० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. यावर सुनेत्रा पवार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून २०० दशलक्ष घनफूट पाणी मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

शिर्सुफळ तलावात स्वतंत्र बांध, गेज मीटर बसवणार

शिर्सुफळ तलावात स्वतंत्र बांध घालण्याच्या कामासाठी पोकलेन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवण्यात आली. तसेच बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी या कामावर लक्ष ठेवून ते तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

दुसरीकडे, खडकवासला कालव्यातून शिर्सुफळ तलावाजवळ येणाऱ्या पाण्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत तातडीने गेज मीटर बसवण्याचे निर्देश देण्यात आले. तलावातील स्थानिक पाणीसाठा आणि सिंचन योजनेतून पाणी उचलण्याची योग्य पातळी निश्चित करण्याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.

ज्यूस देऊन उपोषणाची सांगता

सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन आंदोलनाची सांगता केली.

या वेळी शिष्टमंडळातील सतीश गोलांडे, अनिल आटोळे, जालिंदर वायसे, संदीप वाबळे, पंचायत समिती सदस्या शामल वाबळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!