लैंगिक अत्याचार्यांवर कडक लगाम; महिलांच्या सुरक्षेसाठी आदिती तटकरेंची मोठी मागणी

पुणे : महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत राज्य सरकारकडून मोठा आणि कठोर निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे. लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या आरोपींना पॅरोलवर सुटका देण्यावर बंदी आणण्याची हालचाल वेगाने सुरू आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा करण्यात आली.
मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली असून, विधी व न्याय विभागाला आवश्यक प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यास, बलात्कार आणि अन्य गंभीर लैंगिक गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर बाहेर पडण्याचा मार्ग कायमचा बंद होऊ शकतो.

या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना मंत्री आदिती तटकरे यांनी नमूद केले की, अनेक वेळा गंभीर गुन्ह्यांतील आरोपी पॅरोलवर बाहेर आल्यानंतर पुन्हा गुन्हे करतात. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो.

ही साखळी थांबवण्यासाठी कठोर कायदेशीर तरतूद आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, या प्रस्तावित निर्णयामुळे गंभीर गुन्हेगारांवर कायद्याचा अधिक कडक धाक निर्माण होईल आणि महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारची भूमिका अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.