30 जूनची डेडलाइन संपली! HSRP नसलेल्या वाहनांवर राज्यभर कारवाई; मात्र ‘या’ वाहनधारकांना दिलासा

पुणे : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून रोजी संपल्यानंतर परिवहन विभागाने १ जुलैपासून विशेष कारवाई मोहीम सुरू केली आहे. एचएसआरपी न बसवलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश देण्यात आले असले तरी नोंदणी केलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

राज्य सरकारने यापूर्वी अनेक वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र, अंतिम मुदत संपल्यानंतरही अनेक वाहनधारकांनी एचएसआरपी बसवलेली नसल्याचे समोर आले. त्यामुळे नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निर्देशांनुसार, ३० जूनपर्यंत किंवा त्यानंतर अधिकृत एचएसआरपी सेवापुरवठादार कंपनीकडे पाटी बसविण्यासाठी शुल्क भरून नोंदणी केलेल्या वाहनधारकांवर कारवाई करू नये. तपासणीवेळी संबंधित पावती सादर केल्यास त्यांना सूट दिली जाणार आहे.

एचएसआरपीमध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असल्याने वाहनांची अचूक ओळख पटवणे सोपे होते. बनावट नंबर प्लेटचा वापर रोखणे, वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवणे आणि वाहनसंबंधित गुन्हे उघडकीस आणणे यासाठी ही प्रणाली महत्त्वाची मानली जाते. परिवहन विभागाने अधिकृत सेवापुरवठादारांकडून जारी होणाऱ्या पावत्यांचे नमुने सर्व आरटीओ कार्यालयांना पाठवले असून त्यानुसार पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे एचएसआरपी न बसवलेल्या वाहनधारकांनी तातडीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
