आकाशवाणी भवनात धरणे आंदोलन करणं पडलं महागात; राहुल गांधी-प्रियंका गांधींविरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केला गुन्हा

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीत आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीने आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान हा प्रकार घडला.
इंडिया आघाडीच्या या आंदोलनात अनेक नेते आणि खासदार सहभागी झाले होते. संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा आकाशवाणी भवनापासून सुमारे 400 मीटर अंतरावर अडवला. त्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं.

अन् ठिय्या आंदोलन सुरू
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संध्याकाळपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवलं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, त्यानंतर पुन्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आंदोलन सुरू केलं.


आकाशवाणी भवनाकडे कूच
यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आकाशवाणी भवनाच्या दिशेने पुढे गेले. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आकाशवाणी भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी दोन्ही नेत्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद भवन ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात प्रवेश करू नये, यासाठी विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते.
