वेश्याव्यवसाय करण्यास विधवा महिलेने नकार देताच स्पा मालकाचा संताप; पुढे जे घडलं ते धक्कादायक…

उत्तर प्रदेश : नोकरीच्या शोधात असलेल्या २५ वर्षीय विधवा महिलेला स्पा सेंटरमध्ये काम देण्याचं आमिष दाखवत तिच्यावर देहव्यापारासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेने विरोध केल्यानंतर स्पा मालकाने तिच्यावर मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

ही घटना उत्तर प्रदेशातील भदोही येथे घडली. पीडित महिलेची ओळख जौनपूरमधील सुजीत कुमार यादव याच्यासोबत आजमगड येथे झाली होती. सुजीतने स्वतःला स्पा सेंटरचा मालक असल्याचं सांगत महिलेला नोकरीचं आश्वासन दिलं. नोकरीची गरज असल्यामुळे महिला त्याच्यासोबत भदोही येथे आली आणि गेल्या महिनाभरापासून स्पा सेंटरमध्ये काम करत होती.
महिलेच्या तक्रारीनुसार, सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र काही दिवसांनी आरोपीने तिच्यावर इतर महिलांप्रमाणे देहव्यापार करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. महिलेने स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपीने तिला शिवीगाळ केली, केस ओढले, जमिनीवर फेकून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुजीत कुमार यादव याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील गुन्हेगारी धमकी, अपमान करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न आणि दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून स्थानिक परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
