सोहम कसबेच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी; आमदार माऊली कटके यांचे प्रशासनाला तातडीचे निर्देश..


लोणी काळभोर: कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील अवघ्या दोन वर्षांच्या कु. सोहम लखन कसबे या चिमुकल्याचा ३० जून रोजी शासकीय ओढ्यातील खड्यात पडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळला आहे. या घटनेमुळे कसबे कुटुंबावर मोठे मानसिक व आर्थिक संकट कोसळले असून, त्यांना तातडीने शासकीय आर्थिक मदत मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे.

हवेली पंचायत समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद पुणे आरोग्य समितीचे सदस्य युवराज हिरामण काकडे यांनी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांची भेट घेऊन, सोहमच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष बाब म्हणून आर्थिक मदत मंजूर करण्याची मागणी केली. या संदर्भात आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याची विनंतीही त्यांनी केली.

या मागणीची गांभीर्याने दखल घेत आमदार माऊली कटके यांनी लोणी काळभोरचे अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांना लेखी पत्र देत, सोहमच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सर्व कागदपत्रांसह जिल्हाधिकारी, पुणे यांच्या माध्यमातून तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या पत्रात सोहमच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठे मानसिक व आर्थिक संकट ओढवले असल्याचा उल्लेख करत, मानवतावादी दृष्टिकोनातून या प्रकरणाचा विशेष बाब म्हणून विचार करून शासनाने त्वरित मदत मंजूर करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या हालचालीमुळे शोकाकुल कसबे कुटुंबाला लवकरच आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!