लसूण जास्त दिवस टिकवण्याच्या सोप्या टिप्स; स्वयंपाकघरातील टेंशन होणार दूर

जेवणात लसूण म्हणजे हक्काचं चीज! भाजी असो की चटणी, लसूण घातला की जेवणाला मस्त चव आणि सुगंध येतोच. म्हणूनच गावाकडून शहरापर्यंत लसूण प्रत्येक स्वयंपाकघरात लागतोच. पण हा लसूण नीट ठेवला नाही तर लवकर सुकतो, कोंब फुटतो किंवा पावसाळ्यात ओलावा लागून खराब पण होतो.

हीच अडचण टाळण्यासाठी काही घरगुती आणि सोप्या टिप्स खूप उपयोगी पडतात. लसूण नेहमी थंड, कोरड्या आणि हवेशीर जागेत ठेवावा. जाळीच्या टोपलीत किंवा मोकळ्या पिशवीत ठेवला तर तो बराच दिवस टिकतो. गावाकडं जसं कांद्याजवळ लसूण मोकळा ठेवतात, तसं ठेवलं तरी तो जास्त दिवस चांगला राहतो.
लसूण कधीही बंद डब्यात ठेवू नये, कारण तिथे ओलावा वाढतो आणि लसूण सडायला लागतो किंवा पटकन कोंब फुटतात. जर लसूण सोलून ठेवायचा असेल तर तो हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवावा, पण आठवड्याच्या आत वापरून टाकावा.

काही जण लसूण वाळवून त्याची पावडर करून ठेवतात, तर काही लोक लसणाची पेस्ट करून फ्रीझरमध्ये छोटे क्यूब्स करून ठेवतात. सकाळच्या घाईगडबडीत ही पद्धत फारच सोपी आणि कामाची ठरते.

महत्त्वाचं म्हणजे लसूण नेहमी कोरडा ठेवावा आणि ओलाव्यापासून दूर ठेवावा. खराब झालेला किंवा कोंब फुटलेला लसूण लगेच काढून टाकावा, नाहीतर बाकीचा पण खराब होतो.
या छोट्या पण उपयोगी टिप्स वापरल्या तर लसूण जास्त दिवस ताजा राहतो आणि स्वयंपाकात कधीच अडचण येत नाही.