बेंगळुरू हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर, बायकोने भांडी फेकली अन् राकेशला आला राग, नेमकं घडलं काय?

पुणे : पुण्यातील एका ३६ वर्षीय आयटी इंजिनिअरने स्वतःच्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना बंगळुरूतील दोड्डाकम्मनहल्ली भागातील असून, पोलिसांनी आरोपी पतीला पुण्याजवळून अटक केली आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.
गौरी खेडेकर (वय. ३२) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. राकेश राजेंद्र खेडेकर (वय. ३६) असे आरोपीचं नाव आहे. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. राकेशकडे पत्नी गौरीने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. या कारणाने त्यांच्यात वाद झाला. गौरी यावेळी घरातील भांडी आपटू लागली. तेव्हा राकेशने आपण आता राहत असलेल्या रुमचे डिपॉझिट भरलेलं आहे. आपण जर रूम सोडली, तर ते पैसे मिळणार नाहीत, येथे येण्यासाठी खूप खर्च झाला आहे, असं तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने ऐकले नाही.
गौरीने घरातील चाकू घेऊन राकेशला मारण्याची भीती दाखवली. त्याचा राग राकेशला आल्याने राकेशने तिच्या हातातील चाकू घेतला आणि उलट गौरीच्या अंगावर वार केले. गौरी जखमी अवस्थेत घराच्या लॉबीमध्ये पडली होती. त्यानंतर राकेशला तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाली. त्याने तिची बॉडी बॅगमध्ये भरून बाथरूममध्ये ठेवली. व तो मुंबईकडे निघाला.
येताना तो औषध देखील पिला, त्याला पत्नीच्या मृत्यूचे टेन्शन आल्याने त्याने हे कृत्य केले. नंतर मात्र त्याने घटनाक्रम सांगितला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. यामुळे सगळी घटना उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र खेडेकर एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याची पत्नी गौरी सांबरेकर मास मीडियाची पदवीधर असून नोकरीच्या शोधात होती.
दरम्यान, त्याच्यावर सध्या पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेंगळुरू पोलिस पुण्यात दाखल झाले असून, त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. आरोपी राकेश खेडेकर याने सांगितलेला घटनाक्रम अंगावर काटा आणणारा आहे.