अशोक खरात प्रकरण; बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर लढा उभारणार, रुपाली चाकणकरांचा इशारा


पुणे : महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्याच्या आरोपांमुळे अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आपले नाव जोडले जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आता थेट कायदेशीर मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांविरोधात न्यायालयीन लढा उभारण्याची घोषणा केली आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चाकणकर यांनी अशोक खरातच्या कोणत्याही आर्थिक, जमीन किंवा अन्य व्यवहारांशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले. “मी कोणत्याही महिलेला खरातकडे घेऊन गेले नाही. माझा कोणताही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ समोर आलेला नाही. तरीही गेल्या दोन महिन्यांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आरोप करण्यात आले,” असे त्या म्हणाल्या.

अशोक खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर बोलताना त्यांनी सांगितले की, तो अनेक वर्षांपूर्वीचा जुना व्हिडीओ असून त्या काळात त्या कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हत्या. “माझ्या कुटुंबाने इतरांप्रमाणेच खरातला अध्यात्मिक गुरु मानले होते. त्यापलीकडे आमचा कोणताही संबंध नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, समाजकार्यकर्त्या आशा मिरगे यांनी एका चर्चासत्रात केलेल्या वक्तव्यांविरोधात आपण तीन वेळा कायदेशीर नोटीस पाठवली होती, मात्र ती स्वीकारण्यात आली नाही, असा दावा चाकणकर यांनी केला. यानंतर माझगाव न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली असून न्यायालयाने आशा मिरगे यांना २ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली.

याशिवाय, पुराव्यांशिवाय आरोप करणाऱ्या इतर काही महिलांनाही दिल्ली उच्च न्यायालयामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “ही लढाई केवळ माझ्यासाठी नाही, तर प्रत्येक महिलेच्या सन्मानासाठी आहे. कोणत्याही स्त्रीच्या चारित्र्यावर विनाकारण चिखलफेक होऊ नये, यासाठी मी न्यायालयीन मार्गाने लढणार आहे,” असे चाकणकर म्हणाल्या.

गुवाहाटीतील एका छायाचित्राबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. दर्शनासाठी कुटुंबासह गेलेल्या प्रवासादरम्यान अशोक खरात त्याच्या कुटुंबासोबत तेथे उपस्थित होता. त्यावेळी तो आरोपी असल्याची माहिती नव्हती. अटकेनंतरच त्याच्यावरील गंभीर आरोपांची माहिती समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

अशोक खरात प्रकरणातील तपास पारदर्शक व्हावा यासाठी आपण महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला होता, याची आठवण करून देत चाकणकर यांनी सत्य न्यायालयात समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!