‘आईचाच विश्वास हरवला…’ इन्स्टाग्रामवर शेवटचा व्हिडिओ पोस्ट करत 38 वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक प्रकरण उघड


बरेली : देशभरात मानसिक तणाव आणि नैराश्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुटुंबातील गैरसमज आणि मानसिक तणावामुळे एका 38 वर्षीय तरुणाने विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर शेवटचा व्हिडिओ पोस्ट करत आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या. या व्हिडिओमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बरेली जिल्ह्यातील नवायल गावातील रहिवासी राजीव गंगवार यांनी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास इन्स्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येचे कारण कोणत्याही प्रेमप्रकरणाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट केले. “माझ्या आईलाच माझ्यावर विश्वास राहिला नाही. मी कुटुंबासाठीच हे पाऊल उचलत आहे,” असे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःचा मृतदेह पुलभाटा–मुडिया टोल प्लाझाजवळ सापडेल, अशी माहितीही दिली होती. त्यानंतर त्यांनी विषारी पदार्थाचे सेवन केले. काही वेळातच त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

स्थानिक नागरिकांना रस्त्याच्या कडेला राजीव यांचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात मृत्यू विषारी पदार्थाच्या सेवनामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, मृतदेहाच्या हनुवटीवर किरकोळ जखमेची खूण आढळल्याने पोलिसांनी या बाबीचीही नोंद घेतली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सध्या पोलिस राजीव यांचा मोबाईल फोन, इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुरावे तपासत आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी करून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या घटनेमुळे मानसिक तणाव, कौटुंबिक संवाद आणि भावनिक आधार यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!