शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानचे २ हजार अन् नमोचे ४ हजारही मिळणार? ३० ऑक्टोबरची अपडेट काय?

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या ३० ऑक्टोबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मात्र, महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे नववे आणि दहावे हप्ते अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी या योजनेचे चार हजार रुपये मिळणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पीएम किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आता २४ व्या हप्त्याच्या वितरणाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे, आधारशी जोडलेले बँक खाते सक्रिय ठेवणे आणि जमिनीच्या नोंदी अद्ययावत असणे आवश्यक आहे. संबंधित अटींची पूर्तता केलेल्या पात्र शेतकऱ्यांनाच या हप्त्याचा लाभ मिळेल.
नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये कधी मिळणार?
दुसरीकडे, महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे नववे आणि दहावे हप्ते प्रलंबित आहेत. या दोन्ही हप्त्यांच्या वितरणासाठी सुमारे ३,७०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. या निधीसंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते; मात्र त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत आर्थिक मदतीची गरज असताना या प्रलंबित हप्त्यांच्या वितरणाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांना मिळणार ११ हजार रुपये?
पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये, दुष्काळी मदतीचे पाच हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये, अशा तिन्ही रकमा मिळाल्यास पात्र शेतकऱ्यांना एकूण ११ हजार रुपयांची मदत मिळू शकते.
मात्र, नमो शेतकरी योजनेच्या प्रलंबित हप्त्यांच्या वितरणाबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नसल्याने या चार हजार रुपयांच्या रकमेबाबत अद्याप अनिश्चितता आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी नमो योजनेचा निधी मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
