‘अजितदादा’ पुन्हा केंद्रस्थानी! ₹1,000 कोटींच्या ‘कृषी समृद्धी’ योजनेचा शुभारंभ; AI तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना नवी ताकद

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सुरू केलेल्या ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजने’च्या शुभारंभ सोहळ्यात त्यांच्या कार्याचा भावपूर्ण स्मरणोत्सव झाला. श्री गणेश कला क्रीडा केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमात सहकार, शेती आणि ग्रामीण विकासासाठी अजितदादा पवार यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी ₹1,000 कोटींची तरतूद करण्यात आली असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शेतीला चालना देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री व जिल्हा बँकेचे संचालक दिलीप वळसे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, आमदार शंकर मांडेकर, म्हाडा पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अजितदादा पवार यांनी आयुष्यभर शेतकरी, शेती आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने काम केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला देशातील अग्रगण्य बँक बनविण्यामागे त्यांची दूरदृष्टी, नेतृत्व आणि निर्णयक्षमता कारणीभूत ठरली. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीला सर्वोच्च प्राधान्य दिले आणि त्याच विचारातून आधुनिक तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.


त्या पुढे म्हणाल्या की, हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च आणि बदलत्या कृषी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात AI तंत्रज्ञानासाठी ₹500 कोटींची तरतूद केली होती. ऊस शेतीमध्ये AI चा वापर केल्यास उत्पादनात सुमारे 40 टक्क्यांपर्यंत वाढ, तसेच पाणी आणि खतांची बचत होऊ शकते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळाल्याचे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पुणे जिल्हा बँकेचा विकास झाला, तसेच स्वतःच्या राजकीय प्रवासातही त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात ‘आदर्श शेतकरी सन्मान सोहळा’ही पार पडला. जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी पुरस्काराने सन्मानित शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी नव्या कर्ज योजनेची सविस्तर माहिती देत, AI आधारित कृषी सेवा, सुलभ कर्जपुरवठा आणि आधुनिक शेतीला आर्थिक बळ देण्याचा बँकेचा संकल्प व्यक्त केला.
भावनिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात एकच भावना व्यक्त झाली—अजितदादा पवार यांनी पाहिलेल्या समृद्ध, तंत्रज्ञानसक्षम आणि आत्मनिर्भर शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.