राज्यात पावसाची परिस्थिती गंभीर, दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजारांची मदत करा…


नागपूर : राज्यात यावर्षी पावसाची परिस्थिती गंभीर निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबत ते म्हणाले, गेले दोन दिवस विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यांचा दौरा केला.

यावेळी असंख्य नागरिक, शेतकरी यांच्याशी संवाद साधला. आजच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये बळीराजा अत्यंत गंभीर संकटात अडकला असून त्यांच्या अडचणी सरकारदरबारी मांडण्यासाठी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी मॅडम यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

तत्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत, मजुरांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये मदत, विद्यार्थ्यांची संपूर्ण शुल्कमाफी, जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची तातडीने अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना नवीन कर्जवाटप, पीक विमा योजनेचे ट्रिगर वगळल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

हे ट्रिगर तातडीने लागू करणे, जनावरांच्या चाऱ्याचे आणि पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे नियोजन, रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध करून देणे, धानाला २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी बोनस देणे, ३५०० रुपये दराने धानाची खरेदी यासह इतरही प्रश्नांवर चर्चा केली आणि या मागण्यांचे निवेदनही त्यांना दिले.

यावेळी प्रकाश गजभिये, सलीलभाऊ देशमुख, रमेशचंद्रजी बंग, अंजलीताई साळवे, विनोदजी हरडे, अविनाशजी गोतमारे, अब्दुल्ला फारुखी, गुडधे पाटील, वैशाली टालाटूले, अतुल वांदीले, रविकांत बोपचे, बेबीताई उईके, अनुप खराडे, गणेश चन्ने, कपिल वानखेडे, नाना केणे, शैलेंद्र तिवारी, सुधीर मोहोड, दिनेश बंग, मुनाज शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!