एकनाथ शिंदे लंडनमध्ये असतानाच ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का; नगरसेवक पद रद्द, नऊ जणांवरही टांगती तलवार


मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुरस्कार सोहळ्यासाठी लंडनमध्ये असतानाच त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाणे महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. आदिवासी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेविका पद आपोआप संपुष्टात आले आहे.

सुलेखा चव्हाण या ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ अ मधून बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे यांनी १६ जून २०२६ रोजी दिलेल्या आदेशाच्या आधारे त्यांचे नगरसेविका पद रद्द झाल्याचे ठाणे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

चव्हाण यांचे पद रद्द झाल्याने आता या जागेवर पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या बिनविरोध निवडून आल्याने त्यांच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार नव्हता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेबाबत निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या आणखी नऊ नगरसेवकांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार कायम आहे. ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख रोहिदास मुंडे यांनी या नऊ नगरसेवकांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता असून पक्षाकडे चांगले संख्याबळ आहे. त्यामुळे एका नगरसेविकेचे पद रद्द झाल्याने सत्तेच्या संख्याबळावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नसली, तरी पक्षाच्या प्रतिमेला हा धक्का मानला जात आहे.

याआधी मुंबई महापालिकेत ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचेही जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील विरोधक समाधान सरवणकर यांनी राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

विशाखा राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, ‘मी २० नगरसेवक फोडून आणते, मात्र मला या प्रकरणातून वाचवा,’ असा दावा सरवणकर यांनी केला होता. या आरोपांनंतर आता ठाण्यातील सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द झाल्याने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!