लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता लवकरच ; 344 कोटींच्या निधीला मंजुरी, ई-केवायसीसाठीही मिळू शकते नवी संधी
पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना मे महिन्याचा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे. अनुसूचित जाती घटकातील पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने 344.74 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून तो महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लाभार्थ्यांची छाननी करून केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळेल याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागावर सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, योजनेच्या निकषांमध्ये बसत नसल्याने सुमारे 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. तर जवळपास 1 कोटी 70 लाख महिला लाभासाठी पात्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

याचबरोबर ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले असून संबंधित महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी एक मुदत दिली जाऊ शकते.

योजनेची प्रमुख पात्रता
महिला वय 21 ते 65 वर्षे असणे आवश्यक
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे
अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी
या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार-संलग्न बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जातात. त्यामुळे वर्षभरात प्रत्येक लाभार्थी महिलेला 18 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते.