महिलेच्या खुनाचा २४ तासांत उलगडा; शारीरिक संबंधांना नकार दिल्याने जीव घेतल्याचा आरोप
रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात घडलेल्या एका खळबळजनक खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. झाडाझुडपांमध्ये अर्धनग्न अवस्थेत आढळून आलेल्या महिलेच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मृत महिला आणि आरोपींची पूर्वीपासून ओळख असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेच्या दिवशी तिघांची बाजार परिसरात भेट झाली होती. त्यानंतर ते एकत्र गेले होते. यावेळी मद्यधुंद अवस्थेतील आरोपींनी महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप आहे. मात्र महिलेने त्यास नकार दिल्यानंतर आरोपी संतप्त झाले. त्यातून वाद निर्माण होऊन महिलेवर हल्ला करण्यात आला.
प्राथमिक तपासात आरोपींनी महिलेच्या चेहऱ्यावर मारहाण केली आणि तिचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह झाडाझुडपांमध्ये अर्धनग्न अवस्थेत टाकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत तांत्रिक माहिती, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान एका क्रशरवर काम करणाऱ्या रामअवतार ऊर्फ शेरा रामविश्वास केवट याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार सुनील मोतीलाल विश्वकर्मा याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींकडून अधिक माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांच्या जलद आणि प्रभावी तपासामुळे गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा झाला आहे.