रात्रभर सीसीटीव्हीत कैद झाला विकृत प्रकार! पिंपरी-चिंचवड हादरलं; भटक्या कुत्रीवर अत्याचार करणारा तरुण जेरबंद

पिंपरी-चिंचवड : रात्रीचे अंधारलेले रस्ते, फुटपाथवर शांत झोपलेले मुक्या जीवांचे जग… आणि अचानक समोर आलेला असा प्रकार, ज्याने संपूर्ण शहर संतापाने पेटून उठलं. पिंपरी-चिंचवडमध्ये एका विकृत तरुणाने भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

रावेत परिसरातील ‘खत्री बंधू डेस्टिनेशन कॅफे’जवळ १९ मेच्या रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण अर्धनग्न अवस्थेत परिसरात फिरताना दिसत होता. काही वेळानंतर त्याने फुटपाथवर असलेल्या एका भटक्या कुत्रीला पकडून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे कैद झाला.
घटनेचा व्हिडिओ काही स्थानिक प्राणीप्रेमी आणि नागरिकांपर्यंत पोहोचताच संताप व्यक्त केला जाऊ लागला. प्राणीमित्र संघटनांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर रावेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीची ओळख पटवली.

या प्रकरणात राजेंद्र रघुनाथ शाहू (वय ३५) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मूळचा ओडिशा राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय न्याय संहिता तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

या घटनेनंतर शहरातील प्राणीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. “अशा विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे समाज असुरक्षित होत चालला आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, रावेत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.