Shirur : शिरुर लोकसभेत बहुचर्चित मंगलदास बांदल यांची एन्ट्री! वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीने शिरुरचा लोकसभेचा गड आता गाजणार….

Shirur उरुळीकांचन : शिरुर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन विकास आघाडीने जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याचा निर्णय घेतल्याने शिरुर लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीचे सर्वच चित्र संभाव्य लढतीने बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांदल यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील संभाव्य नाराजीचा फायदा उठविण्याचा निर्णय घेतला असला तरी, बांदल यांच्या उमेदवारीने शिरुर लोकसभेतील वातावरण मात्र ढवळून निघणार आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तयारी करुनही उमेदवारी न मिळालेले मंगलदास बांदल यांनी मतदारसंघात संपर्क ठेऊन मिळेल त्या पक्षाकडून निवडणूकीत उतरविण्याचा चंग बांधला होता. त्यांनी उमेदवारीसाठी शरद पवार यांच्यापासून उध्दव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस असा प्रवास करुन उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राज्यातील युती व आघाड्यातील जागावाटप सुरू असताना शिरुर लोकसभा मतदारसंघातील चित्र निवडणुकीपर्यंत स्पष्ट होत नसल्याने सर्व पक्षातील पर्याय खुले ठेवत त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्धार कायम ठेवला होता.
शिरुर लोकसभेची तयारी केलेल्या भाजपला ऐनवेळी राष्ट्रवादीला जागा द्यावी लागली तसेच शिवसेनेच्या शिंदे गटातून आलेल्या माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी द्यावी लागल्याने जागावाटपात समाधान न झालेल्या भाजपला जागावाटपातून पासून लांब रहावे लागल्याने मतदारसंघात ताकद असून नाराजीनाट्य सुरू झाले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीत आलबेल परिस्थिती नसून तीन टर्म आढळरावां विरुध्द दोन हात केलेल्या राष्ट्रवादीतील अजित पवार गटाला आढळराव पाटील यांच्या प्रचारात उतरावे लागणार असल्याने या बदलेल्या परिस्थितीने नाराजी नाट्य सुरू आहे. Shirur
अशातच शिरुर लोकसभा मतदारसंघात महत्वाचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी मागील काळात आलेले अपयश व मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा मतदारसंघात तुटलेला संपर्क या कारणांनी मतदारसंघातील नाराजीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न बांदल यांनी केला आहे.
या तयारीत बांदल यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यावर लोकसभा लढण्याची केलेली तयारी, मराठा आंदोलकांनी त्यांच्या उमेदवारी दिलेला प्रस्ताव हे बांदलांना जमेच्या बाजू ठरणार आहे. वंचित आघाडीची मते व बांदल यांचा मतदारसंघात स्वतःचा शिरुर तालुका, आंबेगाव मतदारसंघात जोडलेला तालुका तसेच हवेली , हडपसर व खेड तालुक्यात असलेला जनसंपर्क पाहता शिरुर लोकसभेची तिरंगी लढत आता घमासान होणार असल्याची चिन्हे दिसत आहे.