पुण्यात बड्या कंपनीत लागली नोकरी, सुट्टीसाठी घरी आली अन् काळाने घात केला; बहीण-काकीसह तिघींचा दुर्दैवी अंत


परभणी : अवघ्या १५ दिवसांपूर्वी नामांकित कंपनीत नोकरी मिळाल्याने आनंदात असलेल्या एका तरुणीचा, तिच्या बहिणीचा आणि काकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. नदीत वाहून गेलेल्या शाम्पूच्या पुड्या पकडण्याच्या प्रयत्नात तिघीही खोल पाण्यात बुडाल्या.

मृतांमध्ये उत्कर्षा उत्तम जाधव (२१), समीक्षा उत्तम जाधव (१८) आणि सिंधू दत्ता जाधव (४५) यांचा समावेश आहे. त्या सोनपेठ तालुक्यातील रहिवासी होत्या. उत्कर्षाला नुकतीच पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाली होती. वीकेंडची सुट्टी असल्याने ती आपल्या गावी आली होती.

शनिवारी उत्कर्षा, तिची बहीण समीक्षा आणि काकी सिंधू जाधव या मोहळा येथील गोदावरी नदीपात्रात कपडे धुण्यासाठी आणि पोहण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी शाम्पूच्या काही पुड्या पाण्यात वाहून जाऊ लागल्या. त्या पकडण्यासाठी एक तरुणी रिकामा प्लास्टिकचा डबा घेऊन नदीत उतरली. मात्र, डब्यात पाणी शिरल्याने तिचा तोल गेला आणि ती बुडू लागली.

बहिणीला वाचवण्यासाठी दुसरी बहीण नदीत उतरली. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तीही अडचणीत सापडली. दोघींना बुडताना पाहून काकी मदतीसाठी धावली, पण दुर्दैवाने तिलाही जीव गमवावा लागला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवून तिघींचे मृतदेह बाहेर काढले. या दुर्दैवी घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी नोकरी मिळालेल्या तरुणीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!