पुणेकरांना पुन्हा महागाईचा झटका! ऑगस्टपासून रिक्षाभाड्यात मोठी वाढ; पहिल्या दीड किमीचे 30 रुपये, प्रति किमी 20 रुपयांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

पुणे : महागाईच्या वाढत्या झळा आता पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासावरही पडणार आहेत. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढलेल्या किमतींमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्षाभाडे वाढवण्याची मागणी करणाऱ्या रिक्षा संघटनांना अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. पुण्यात रिक्षाभाडेवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष यांच्या मंजुरीनंतर ऑगस्ट महिन्यापासून नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) रिक्षा संघटनांकडून करण्यात आलेल्या भाडेवाढीच्या मागणीचा सकारात्मक विचार करत सुधारित दरांचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून मंजुरी मिळताच नवीन दरांची अधिकृत अंमलबजावणी होणार आहे.

सध्या पुण्यात रिक्षाचे किमान भाडे पहिल्या दीड किलोमीटरसाठी 25 रुपये असून त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी 17 रुपये आकारले जातात. प्रस्तावित दरांनुसार किमान भाडे 30 रुपये करण्यात येणार असून प्रति किलोमीटरचा दर 20 रुपये होणार आहे. म्हणजेच किमान भाड्यात 5 रुपयांची, तर प्रति किलोमीटर दरात 3 रुपयांची वाढ होणार आहे.


रिक्षा संघटनांच्या मते, गेल्या काही वर्षांत सीएनजी, पेट्रोल, डिझेल, वाहनांच्या सुट्या भागांचे दर, देखभाल खर्च तसेच विमा आणि इतर खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र रिक्षाभाड्यात त्यानुसार बदल झाला नसल्याने चालकांवर आर्थिक ताण वाढत होता. त्यामुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचा दावा संघटनांनी प्रशासनाकडे केला होता. प्रशासनानेही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे.
या निर्णयाचा थेट परिणाम पुण्यातील लाखो प्रवाशांवर होणार आहे. नोकरदार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजच्या प्रवासासाठी रिक्षेवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या मासिक प्रवासखर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसलेल्या भागांतील नागरिकांना या वाढीचा अधिक फटका बसू शकतो.
पुणे शहर आणि परिसरात सुमारे 1.30 लाख रिक्षा कार्यरत असून दररोज अंदाजे 20 लाख प्रवासी रिक्षातून प्रवास करतात. त्यामुळे भाडेवाढीचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम मंजुरीनंतर नव्या दरांची अधिकृत घोषणा होण्याकडे रिक्षाचालकांसह पुणेकरांचे लक्ष लागले आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच नव्या दरानुसार प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात, त्यामुळे पुणेकरांच्या खिशावर आणखी एक आर्थिक भार पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.